१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले होते. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते.
MPSC च्या परीक्षांसाठी पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.
गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले आहे. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
पुण्यात एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील जवळपास लाखभर विद्यार्थी वास्तव्याला आहे. या विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च जवळपास 7000 रुपये इतका आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एमपीएससीची परीक्षा पाचवेळा पुढे ढकलली आहे. आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असे पडळकर यांनी सांगितले.
‘पीपीई कीट घालून परीक्षा घ्या, पण घ्या’
आतापर्यंत UPSC, बँकिंग आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आरोग्य विभागाची भरती पक्रियाही पार पडली. मग कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकार एमपीएससीची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. सरकारने अधिवेशन सुरु असताना चर्चा करुन हा निर्णय का घेतला नाही? भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागली तरी चालतील पण MPSC ची परीक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंडळींनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.