#ग्लोबल टीचर पुरस्कार: जगात भारी सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी

0
563
  • सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावलाय. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

क्यूआर कोडचा वापर राज्यातील पाठ्यपुस्तकातील व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी केला. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे किल्ले इत्यादींच्या इतिहासातील लिखित भाषेला तंत्रज्ञानाद्वारे जिवंत करण्याचा प्रयत्न केला. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वत: पडताळणी करण्याची क्षमता विकसित झाली. या विविध उपक्रमांची दखल घेतली गेली. सुमारे ५० विषयांतील विविध पैलूंचे तज्ज्ञांकडून परीक्षण केल्यानंतर ही निवड झाली आहे.

रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले.

माझा झालेला हा सन्मान केवळ माझा नसून राज्यातील आणि देशातील सर्व शिक्षकांचा आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे. वार्की फाऊंडेशनचे मी मन:पूर्वक आभार मानतो. माझ्या कामात सहकार्य केल्याबद्दल राज्य सरकारचेही आभार, असं रणजीत डिसले यांनी म्हटलं. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल, असंही डिसले यांनी म्हटलं.

ग्लोबल टीचर पुरस्कार नेमका का व कशासाठी?
शिक्षणाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातही आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सर्वोत्तम शिक्षकांच्या कार्याची जगभर ओळख व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा याकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. शिक्षणाचा अभाव हे आजही जगभरात राजकीय,सामाजिक,आर्थिक आणि आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे. दारिद्र्य, भेदभाव आणि संघर्षाचे समूळ उच्चाटन करण्याची शक्ती केवळ शिक्षणातच आहे, असे वर्की फाउंडेशनचे मत आहे.

काय हवी पात्रता : सन २०१५ मध्ये या पुरस्कारास सुरुवात झाली. संबंधित देशांच्या स्थानिक कायद्यांनुसार मान्यता असलेल्या शाळांमध्ये शिकवणारा जगातील कोणत्याही देशाचा शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र ठरतो