कोरोना नियमाचे पालन करून राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार

0
300
  • ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार

कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याने, सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे दिसत आहे.

टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

कोरोना नियम पाळून शाळा सुरु होणार
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

पालकांची समंती महत्त्वाची
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

पूर्वतयारी करावी लागणार..
शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत त्याबाबतची तयारी शिक्षण विभागला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला या दरम्यान पूर्ण करायची आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभाग सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा नियोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.