अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीसह क्रिडा आणि राजकीय व्यक्तींनी व्यक्त केला शोक

0
279

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात निधन झाल्याचे त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी सांगितले. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी गुरुवारी निधन झाले. ऋषी बराच काळ कर्करोगाने ग्रस्त होते आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उपचारानंतर अमेरिकेतून भारतात परतले होते. त्यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीसह क्रिडा आणि राजकारणाशी संबंधित लोकांनीही शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘बहुआयामी, प्रेमळ आणि चैतन्यशील… असे होते ऋषी कपूर. ते प्रतिभेचे उर्जास्थान होते. त्यांच्याबरोबर मी केलेले संभाषण मला नेहमीच लक्षात राहील, सोशल मीडियावरील देखील. चित्रपट आणि भारताच्या प्रगतीविषयी त्यांते भावूक होते. त्यांच्या निधनाने मी दु: खी आहे. त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना सहानुभूती. ओम शांती.’

प्रकाश जावडेकर

ऋषी कपूर हे केवळ महान अभिनेतेच नव्हते, तर ते एक चांगला माणूसही होते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी
हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भयंकर असा आहे. ऋषी कपूर हे उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

गानकोकिळा लता मंगेशकर
यांनी आपले दु: ख व्यक्त करण्यासाठी दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘मी काय बोलू? काय लिहावे ते समजत नाहीये. ऋषीजींच्या निधनामुळे मी मनातून दु:खी आहे. त्यांच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लहानग्या ऋषी कपूरचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘काही काळापूर्वी ऋषीजींनी त्यांचे आणि माझे हे छायाचित्र पाठविले होते. ते सर्व दिवस, सर्व गोष्टी खूप आठवतात. माझ्याकडे शब्दच नाहीत.’

अक्षय कुमार
‘ऋषी कपूर यांच्या निधनाची निराशाजनक बातमी नुकतीच ऐकली. ते एक लेजेंड, एक उत्तम सहकारी आणि एक चांगले कौटुंबिक मित्र होते. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

अमिताभ बच्चन
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर सकाळी साडेनऊच्या सुमारास कपूरच्या मृत्यूची बातमी दिली होती. त्यांनी लिहिले, ‘तो गेलाय… ऋषी कपूर गेलाय… मी उद्धवस्थ झालो

सचिन तेंडुलकर
ऋषीजी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांचे चित्रपट पाहून मोठा झालो. ते जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा खुप आनंद वाटत असे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. नितूजी, रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंबियांच्या दुखात मी सहभागी आहे.

विराट कोहली
ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त मनाला न पटणारी आणि अविश्वसनिय वाटते. काल इरफान खान तर आज ऋषी कपूर जी. आपल्यातील दिग्गज सोडून जात आहेत हे पटत नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. मी कपूर कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे.