‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

0
348
  • जान्हवी कपूर साकारतेय प्रमुख भूमिका
  • अद्याप त्याच्या तारखेची घोषणा नाही

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे पोस्टर आणि संबंधीत एक व्हिडिओ शेअर केला आहे. गुंजर सक्सेना असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री जान्हवी कपूर गुंजन यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटगृह देखील बंद आहेत. तेव्हा हा आगामी चित्रपटदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे

जान्हवी कपूर लवकरच कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. आता निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तो कोणत्या तारखेला प्रदर्शित होईल याबद्दल जाहीर केले नाही आहे.

१९९९ साली कारगिल युद्धात गुंजन यांचे योगदान आहे. त्यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या साथीदारांचे प्राण वाचवले होते. गुंजन यांना त्यांच्या शौर्यासाठी सूर्यवीर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या या कामगिरीला उजाळा देणारा हा सिनेमा असणार आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहे. जान्हवीने त्यांचा एअर फोर्सचा हाच निळा डगला परिधान केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जान्हवीने हा रोल अधिक चांगला करण्यासाठी गुंजन यांची भेट घेतली आहे. तसेच तिने विमान उडवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.

शरण शर्मा दिग्दर्शित ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, त्याची आई हिरू जोहर, झी स्टुडिओ आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला 13 मार्च आणि नंतर 24 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहितीही लवकरच समोर येईल.