चित्रीकरणाला अखेर परवानगी; मनोरंजन होणार अनलॉक

0
395

मागील आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चित्रपट, मालिका अशा कोणत्याही मनोरंजनात्मक गोष्टींचं चित्रीकरण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं. अनेक चित्रपटांचं अगदी काही दिवसांचं चित्रीकरण देखील अडकलं होतं. याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार किंवा पडद्यामागचे कर्मचारी अशा सगळ्यांनाच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५.० आणि अनलॉक १.० जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारने राज्यातल्या सामान्य जनतेसाठी अनलॉक १, २ आणि ३ या फेजसाठी घोषणा केल्या. त्यानंतर आता मनोरंज विश्वासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून चित्रीकरणाला आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे.

यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील.

या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. सध्या चित्रीकरणाच्या कामांना परवानगी मिळवण्यासाठी निर्मात्यांना मुंबईत गोरेगाव येथील चित्रनगरीत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज करावे लागतील,

तर उर्वरित जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.

जाणून घेऊया काही कडक नियम:-

  • नव्या नियमांनुसार ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती, गरोदर महिला तसेच कलाकारांचे कुटुंबिय सेटवर येण्यास पूर्णपणे मनाई आहे. प्रत्येक सेटवर डॉक्टर, नर्स आणि अॅम्बुलन्स असणं गरजेचं आहे. या दरम्यान कोणी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यावर तातडीने उपचार होणं गरजेचं आहे. सेटवर कोणाशीही हात मिळवणी करायला, किस करायला किंवा गळा भेट करायला मनाई आहे. दुसऱ्यांचा मेकअप किट वापरायचा नाही. तसेच कपडे दररोज धुतले गेले पाहिजेत. सेटवर वापरण्यात येणारं सामान कमी करावं.
  • सेट जास्तीत जास्त स्वच्छ हवा. एका टेन्टमध्ये पाचपेक्षा जास्त लोक थांबू शकत नाहीत. सिनेमा किंवा मालिकेत लग्नासारख्या मोठ्या शूटला मनाई आहे. सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावच लागेल. प्रत्येक सदस्याला सेटवर येण्यापूर्वी हात साबणाने धुवावेच लागतील. प्रवासातून आलेले कपडे बदलून नवे कपडे सेटवर घालावे लागतील. कोणत्याही सेटवर ३३ टक्क्यांहून अधिक स्टाफ नसावा. यासोबतच सदस्यांना त्यांचे चप्पल- बूट सेटच्या बाहेरच ठेवावे लागतील.
  • नवीन चप्पल आणि मोजे घालावे लागतील जे ते स्वतःच्या घरून आणतील. नियमांनुसार, कास्टिंग, लुक टेस्ट आणि मीटिंग व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्याव्या. कलाकार शक्यतो त्यांच्या घरूनच तयार होऊन येतील आणि स्वतःचा कमीत कमी स्टाफ सेटवर आणेल. फक्त एकच स्टाफ कलाकार स्वतःसोबत आणू शकतात. तिच व्यक्ती हेअर आणि मेकअप दोन्ही करेल. घरूनच जेवणाचा डबा आणायचा आहे. सेटवर कमीत कमी ज्यूनिअर आर्टिस्ट असतील. यासोबत सर्वांकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे. तसेच सेटपर्यंत प्रवास करण्यासाठी त्यांना पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.
  • कलाकारांना स्वतःचे कपडे आणणं बंधनकारक आहे. यासोबोत स्क्रिप्ट किंवा कोणत्याही गोष्टीला कमीत कमी लोकांनी हात लावलेला असावा. मेकअप आर्टिस्टला पीपीई कीट देणं बंधनकारक आहे. हेअर आणि मेकअप आर्टिस्टना फेस शील्ड घालणंही बंधनकारक आहे. नाही तर हेअर आणि मेकअप स्टेशनमध्ये ६ फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे. डिस्पोजेबल किटचा उपयोग मेकअप करताना करण्यात आला पाहिजे. जेणेकरून एकदा वापरून झाल्यानंतर ते किट टाकून दिलं जाईल.