बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते. किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचंही चर्चा होती. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
वाजिद खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती किंवा रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू संदर्भात कोणतंही अधिकृत पत्रक जारी केलेलं नाही. त्यामुळे वाजिद खान यांच्या मृत्यूसंदर्भात कोविड-19, किडनीच्या इन्फेक्शनपासून हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळ्या कारणांची अटकळ बांधली जात आहे. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.
करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.
1998 मधील सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं.
साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या म्युझिकल कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.