बॉलिवूडचे महानायक अमिताभ बचन आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो-सिताबो’ हा सिनेमा येत्या १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आता तुम्हाला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये जाऊन पैसे खर्च करून पाहायची गरज नाही. कारण ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहात नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
देशभरातील सर्व मॉल्स आणि थिएटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवरून रिलीज करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती शेअर केली आहे.
ज्या सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण झालं ते प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अशात अनेक हॉलिवूडपटांनी डिजीटल माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. आता बॉलिवूडही त्याच मार्गावर चालण्याचा विचार करत असल्याचं दिसतं. शूजित सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला आहे. १२ जूनला हा सिनेमा तुम्ही घर बसल्या पाहू शकता.
यामध्ये अमिताभ बच्चन सांगतात की, मी १९६९ साली सिनेसृष्टी जॉईन केली. २०२० पर्यंत मला या सिनेसृष्टीत ५१ वर्षे झाली आहे. एवढ्या वर्षात अनेक बदल आणि आव्हान देखील पाहिलं. आता हे नवं चॅलेंज… डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. १२ जून रोजी ऍमेझॉन प्राईमवर हा सिनेमा एकाचवेळी २०० हून अधिक देशात प्रदर्शित होणार आहे. या नवीन बदलाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.
आयुष्मान म्हणाला की, ”गुलाबो सिताबो’ सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या सिनेमातून मी शूजीत दासोबत पुन्हा एकदा काम करू शकलो. विकी डोनरनंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचा आनंद आहेच. आज मी जो आहे तो फक्त त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी या सिनेमासाठी माझी निवड केली याचा मला आनंद आहे. याशिवाय या सिनेमात मी पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. हे माझ्यासाठी स्वप्न खरं होण्यासारखं आहे.
https://twitter.com/SrBachchan/status/1260774335762952192/photo/1