‘मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान’ याचा आज वाढदिवस

0
416

आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. आमीरचा जन्म मुंबई येथे १४ मार्च १९६५ ताहिर हुसैन व झीनथ हुसैन, या चित्रपट निर्माताच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वात मोठा, त्याला एक भाऊ अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या इम्रान खान एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘आमिर खान’ याचा आज वाढदिवस आहे. आमिर त्याच्या कोणत्याही चित्रपटातबाबत अत्यंत जागरुक असतो आणि प्रत्येक चित्रपटासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळेच आमिरला बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्ह्णून ओळखले जाते.

आमीरने 1973 मध्ये ‘यादों की बारात’ या सिनेमात बाल कलाकाराची भूमिका साकारात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आमीर बॉलिवूडमध्ये उठून दिसलो तो ‘कयामत से कयामत तक'(1988) मधील भूमिकेमुळे. या सिनेमाने त्याला ओळख दिली. त्याला सर्वोत्तम नवोदित कलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला.

1996 मध्ये आलेला ‘राजा हिंदुस्थानी’ हा आमीरच्या करिअरमधील हिट सिनेमा होता. त्या सिनेमाने आमीर खानला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला.

‘दिल’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘अंदाज अपना अपना’, रंगीला, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘गुलाम’, ‘सरफरोश’, ‘मन’, ‘अर्थ’, ‘मेला’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘मंगल पांडे: द राइजिंग’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘तारे जमीं पर’, ‘गजनी’, ‘थ्री इडियट्स’, ‘धोबीघाट’, ‘तलाश’, ‘धूम 3’ ‘पीके’, ‘दंगल’ आणि सिक्रेट सुपरस्टार या सिनेमातून आमीरचा सशक्त अभिनय पाहायला मिळाला. लगान या सिनेमाची सर्वोत्तम विदेशी भाषा फिल्म म्हणून 74 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारताकडून निवड झाली होती. आमीर खानने तारे जमीन पर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. तर ‘जाने तू या जाने ना’, ‘पीपली लाइव’, ‘धोबी घाट’, ‘देल्ही बेल्ली’ आणि तलाश’ या सिनेमाची निर्मिती केली.

२०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

आमीर खान सध्या महाराष्ट्रात पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी लढा देत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून त्याने अनेक गावं दुष्काळमुक्त केली आहेत. नेहमीच सामाजिक भान राखत, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आमीर सध्या महाराष्ट्रात दुष्काळाशी दोन हात करत आहे. आमीरच्या या संवेदनशीलतेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अशा या अष्टपैलू मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!