सुशांत सिंगच्या आठवणीने सेलिब्रिटींसोबत राजकीय नेतेही गहिवरले

0
400

रविवारी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यानाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याला ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर सर्वत्र एकच खबळबळ उडाली आहे. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरून सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे असून यामध्ये अनेक सेलिब्रिटीं आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशांतला ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘सुशांत सिंग राजपूत… एका अतिशय प्रतिभावान, उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला. टिव्ही मालिका आणि चित्रपटांतील त्याचा अभिनय खूप चांगला होता. मनोरंजन जगतात त्याने स्वत:च्या परिश्रमाने नाव मिळवलं. तो खूप जणांसाठी प्रेरणास्थान होता. तो अनेक आठवणी मागे ठेऊन गेला आहे. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती’, असे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

तो माझ्या पटणा शहरातून होता. त्याला मी राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यान भेटलो होतो. त्याने त्याचे कुटुंब पटण्यामधील राजीव नगर येथे राहत असल्याचं मला सांगितलं होतं. त्याच्या समोर अजून बरचं आय़ुष्य होतं. खूप लवकर गेला
– रवि शंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

तो तरुण आणि मल्टी टॅलेण्टेड होता. आपण मानसिक आरोग्याची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
– पियुष गोयल

त्याच्याकडे अजून बरचं आयुष्य शिल्लक होतं. गप्पा मारण्यासाठी अगदी छान व्यक्ती होता. त्याचं अशा पद्धतीने जाणं मनाला चटका लावणारं आहे
– राज्यवर्धन सिंग राठोड

सेलिब्रिटी:-

उषा नाडकर्णी
सुशांतच्या जाण्याची बातमी ऐकून सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. उत्तम अभिनेता आणि तेवढाच चांगला माणूस. आम्ही ‘पवित्र रिश्ता’च्या निमित्तानं जवळजवळ दोन-तीन वर्ष एकत्र काम केलं होतं. त्यात तो माझ्या मुलाची भूमिका साकारत होता. शूटिंगच्या वेळी आमच्या खूप गप्पा व्हायच्या. सिनेक्षेत्रातील त्याची वाटचाल पाहून सुखावत होते. पण, आज अचानक हे ऐकलं आणि धक्का बसला.

प्रिया मराठे
सुशांतच्या जाण्याची बातमी ऐकून मी खरं तर आतून हलले आहे. एक हरहुन्नरी अभिनेता, खूप चांगला माणूस, उत्तम कलाकार आणि तेवढाच समजूतदार सहकारी. अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व असलेला सुशांत, भविष्यात काय करायचंय याबद्दल खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. कमी वयात त्यानं बॉलिवूडमध्ये नाव कमावलं होत. सुशांत नेहमी लक्षात राहील आणि त्याला नेहमी मिस करू.

अजय देवगण
अत्यंत वेदनादायी अशी ही बातमी आहे. मला खूप धक्का बसला आहे. तो एक छान, सकारात्मक, संवेदनशील, प्रामाणिक आणि बुद्धिमान कलाकार होता. त्याचं जाणं अविश्वसनीय आहे.

सोनाक्षी सिन्हा
शब्दांच्या पलीकडे व्यक्त न करता येणारा हा धक्का आहे. आपल्याला कधीच कळू शकत नाही की, एखाद्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे, कोण कुठल्या मनस्थितीतून जात आहे.

अनुपम खेर
माझ्या प्रिय सुशांतसिंग राजपूत…. का रे?…. का?

वैभव तत्ववादी
नैराश्याकडे दुर्लक्ष करू नये. कृपया आपल्या कुटुंबाच्या सदस्यांशी बोला किंवा तुम्हाला निराश वाटत असल्यास समुपदेशकाची मदत घ्या असं मी सर्वांना आवाहन करतोय. सुशांतच्या आत्म्यास शांती लाभो.