‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती विश्वात पदार्पण केल्यानंतर आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. बाई गं’ असं या नव्या चित्रपटाचं नाव असून हा सिनेमा १४ जून २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष स्वप्नीलसाठी खूपच खास ठरणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वप्नील निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
स्वप्नीलच्या इतर कामाविषयी बोलायचे झाल्यास तो या सिनेमांव्यतिरिक्त प्रसाद खांडेकर दिग्दर्शित सिनेमात दिसणार आहे. प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्यासह अनेक विनोदी कलाकार या सिनेमात दिसतील. याशिवाय स्वप्नील जोशी बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा २’मध्येही मुख्य भूमिकेत आहे. एकंदरित २०२४ हे वर्ष स्वप्नीलसाठी खूपच व्यग्र वेळापत्रक असणारं ठरणार आहे.
दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सिनेमाबद्दल काय म्हणाला स्वप्नील?
बाई गं’मध्ये स्वप्नीलबरोबर मुख्य भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दल अभिनेता म्हणतो, ‘नाच गं घुमा’नंतर मी लगेच ‘बाई गं’सारखा चित्रपट करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात माझी भूमिका काय आहे हे सर्वांसमोर स्पष्ट होईल. 2024 मध्ये मी खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना! ‘बाई गं’मध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे परंतु यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.