अग्गबाई सासूबाई मालिका: मोहन जोशी नव्या आजोबांच्या रुपात

0
395

अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखांसह वाहवा मिळवली ती आजोबांनी. आजही “सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर” हे संवाद ऐकले की आजोबांची आठवण येते. जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या दमदार अभिनयाने ही भूमिका जिवंत केली होती.

काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या टीमला एक धक्का पचवावा लागला होता. तो धक्का बसला ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनामुळे. आधी ज्येष्ठ कलाकारांना सेटवर परवानगी नसल्यामुळे आणि नंतर रवी पटवर्धन यांच्या निधनामुळे बरेच दिवस मालिकेत आजोबांचा ट्रॅक दिसला नव्हता. पण आता अग्गंबाई सासूबाई या मालिकेत पुन्हा एकदा सोम्या, कोंबडीच्या, ए चप्पलचोर हे संवाद ऐकायला मिळणार आहेत. कारण मोहन जोशींच्या रुपाने मालिकेत नव्या आजोबांची एन्ट्री होणार आहे.

सध्या ही मालिका चांगल्याच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सोहमचं गर्वहरण होऊन आता त्याला आईची किंमत कळू लागली आहे. त्यामुळे आसावरी आणि सोहम यांच्या नात्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी म्हणजेच आजोबा पुन्हा एकदा घरी परतणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी आजोबांची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली होती. मुख्य कलाकारांप्रमाणेच रवी पटवर्धन यांच्या आजोबांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या निधनामुळे मालिकेच्या टीममध्येही एक पोकळी निर्माण झाली होती. पण आता जुन्या आठवणी मनात ठेवत नवी सुरुवात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, हे आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ४ जानेवारी रोजी होणाऱ्या भागात मोहन जोशी आजोबांच्या भूमिकेतून या मालिकेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे ए चप्पलचोर हा संवाद मिस करत असाल तर थोडी कळ काढा तुम्हा हाच संवाद वेगळ्या ढंगात ऐकायला मिळणार आहे.