कोरोना व्हायरसनं मागच्या वर्षभरात जगभरात थैमान घातलं आहे. इतर क्षेत्रांसोबत मनोरंजन क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक चित्रपटांचं शूटिंग रखडलं होतं जे मागच्या काळापासून सुरू झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा अनेक सेलिब्रेटींना करोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचं समोर येत आहे. संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी या कलाकारांच्या करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर आता मनोरंजन क्षेत्रासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी महत्वाच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
काय आहे नियमावली
* जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेवूनच चित्रीकरण करावे.
* चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.
* सर्वांनी सोशल डिस्ट्नसिंग पाळावे.
* सेटवर सँनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.
* आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना पेशंट असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन रिपोर्ट जवळ बाळगावा.
* जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे.
* शूटिंग साहित्य वरचेवर सँनिटाइज करणे आवश्यक आहे
* तंत्रज्ञांनी, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.
* चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स व डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा इतर खाद्यपदार्थ वापरावेत.
* अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरीता आले तर त्यांना सहकार्य करावे.