आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

0
177

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.

आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बाहेर चाहत्यांनी मोठी दर्दी केली होती. अनेक ठिकाणी चाहत्यांनी पोस्टरसह आर्यनचे स्वागत केले. मन्नतबाहेर झालेली मोठी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. शाहरूखच्या बॉडीगार्डसह मुंबई पोलिसांनाही गर्दी नियंत्रण करताना तारेवरची कसरत करावी लागली. शेकडोंच्या संख्यने हजर झालेले चाहते पाहता पोलिसांचा बंदोबस्तही या गर्दीसमोर कमी पडला. मन्नतबाहेर काही शाहरूखच्या चाहत्यांनी आर्यन खानचे फटाके फोडून स्वागत केले. पण मन्नतवर गाडी दाखल झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी अक्षरशः एक सुरक्षा कवच तयार करत मन्नतवर आर्यनची गाडी सुरक्षित पोहचेल यासाठीचा बंदोबस्त केला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या फॅन्सलाही हटकले. तसेच मन्नतबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत केली. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीला पांगवताना पोलिसांची तारांबळ उडाली.

आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.