“स्वराज्यजननी जिजामाता” मालिका: भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत

0
463

स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. शहाजी राजांना बंगळूर प्रांतात जावं लागलं असून जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून मालिकेत प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले आता जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. मालिकेत शहाजीराजांना बंगळूर प्रांतात जावं लागल्याचा भाग दिसत असून, जिजाऊ आता शिवबांना घेऊन पुण्यामध्ये आल्या आहेत. तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे हा अभिनेता करणार आहे शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजीची भूमिका साकारली होती.

एक अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना अशी ख्याती असलेल्या भार्गवीला ऐतिहासिक मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. मालिकाविश्वात भार्गवीने नेहमीच आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या भूमिकेबाबत भार्गवी म्हणाली, की ‘एक आदर्श माता म्हणून ज्यांचं अभिमानानं नाव घेतलं जातं, अशी व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय याचा आनंद आहे. मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. त्याच वेळी मला त्याचा एक भाग होता आलंय ही भावना सुखावणारी आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा मला अभिमान आहे.’

स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी, वर्धनासाठी जिजाऊंचे योगदान अजोड आहे. जिजाऊंच्या कर्तृत्वाचे असंख्य पैलू उलगडणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका आता भार्गवी चिरमुलेच्या अभिनयाने सजणार आहे.

स्वराज्य घडवणाऱ्या मुलुखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.