टीचर्स डे’ म्हटला की आठवते शाळा. शाळेत असताना आपल्याला नेहमीच एका व्यक्तीची भीती वाटते ते म्हणजे शिक्षक. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्याबद्दल आपल्याला मनातील भीती कमी होते. चित्रपटात अनेक कलाकारांनी विविध चित्रपटांमध्ये शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र कधी कधी या शिक्षकांच्या भूमिका केवळ नावालाच होत्या तर काही कलाकारांनी साकारलेल्या शिक्षकांच्या भूमिका खरोखरच शिक्षकाच्या भूमिका होत्या आणि त्यातून प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना काही तरी घेता आले. सिनेमातल्या अशाच काही शिक्षकांविषयी आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती घेणार आहोत.
1. सुश्मिता सेन
सुश्मिताचा निरागस लूक आणि साडी अवतार ‘मै हु ना’ या चित्रपटात सर्वांना फार आवडला होता, सुश्मिताने चांदनी चोप्रा या केमिस्ट्रीच्या शिक्षिकेची भूमिका केली होती.
2. अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॅक’, ‘मोहोब्बते’ आणि ‘आरक्षण’ या 3 चित्रपटात शिक्षकाची भूमिका केली आहे. ‘मोहोब्बते’मध्ये कडक शिस्तीचे नारायण शंकर, मुक्या-बहिऱ्या मुलीला नवीन आयुष्य देणारे देबराज सहायची भूमिका अमिताभ यांनी केली तर प्रामाणिक शिक्षण म्हणून प्रभाकर आनंदची भूमिका आरक्षणमध्ये केली होती. यापैकी त्यांना ब्लॅक चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले.
३. आमिर खान
2007 मध्ये आलेल्या तारे जमीन पर चित्रपटात आमिर खानने शिक्षकाची भूमिका साकारली होती. एका वेगळ्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याला कसे शिकवता येईल ते आमिरने या चित्रपटात दाखवले होते. चित्रपटाची कथा चांगली असल्यानेच आमिरने स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली होती. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंधांवर आधारित हा एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो.
४. राणी मुखर्जी
हिचकी या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीनं नैना ही मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात राणी टॉरेट सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असते. गरीब घरातील मुलांना शिकवण्याचं काम तिच्याकडे असतं. सुरुवातीला नैनाला आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांकडून विविध प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतं. तरीही ती तिचे प्रयत्न सुरूच ठेवते. आपल्यावरच हसणाऱ्या त्या मुलांना शिकवून ती त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देते.
५. हृतिक रोशन
सुपर ३० हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात हृतिक रोशननं आनंद कुमार या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत मुलांना कसा घडवतो आणि त्यांना यशाच्या मार्गावर जाण्यासाठी कसा मदत करतो; हे दाखवण्यात आलंय.
६. बोमन ईराणी
डॉ. अस्थाना आणि डॉ. वीरू सहस्त्रबुद्धे या दोन व्यक्तिरेखा अभिनेते बोमन इराणी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: कोरल्या आहेत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील डॉ. अस्थाना ही भूमिका असो किंवा ‘थ्री इडियट्स’मधील डॉ. वीरू सहस्त्रबुद्धे या भूमिका सिनेमाच्या केंद्रस्थानी नसल्या, तरी त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
७. शाहिद कपूर
पाठशाला या हिंदी चित्रपटात संगीत शिक्षक म्हणून शाहिद कपूर यानेही शिक्षक म्हणून आभिनय केला आहे. सर्व विद्यार्थ्यांचा लाडका शाहिद शिक्षकाच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे.
८. शाहरुख खान
मोहब्बतें चित्रपटात गुरुकूलच्या कडक शिस्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना प्रेमाचा आणि संगीताचा मार्ग दाखवणाऱ्या राज आर्यन या संगीत शिक्षकाची भूमिका शाहरुखनं यात साकारली होती. कॉलेजच्या भिंतींबाहेर जगण्याच्या प्रेमळ व्याख्येची ओळख राज या सिनेमातून करुन देतो.
९. नर्गिस
राज कपूरच्या श्री 420 चित्रपटात नरगिसने आदर्श शिक्षिकेची भूमिका साकारली होती. मुलांनी लहानपणापासूनच खरे बोलण्यास शिकले पाहिजे आणि न घाबरता खरे बोलले पाहिजे असे ती शिकवत असते.
१०. राजकुमार
1981 मध्ये आलेल्या बुलंदी चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही व्रात्य तरुण मुलांना ते कसे वठणीवर आणतात आणि वाईट मार्गावरून परत चांगल्या मार्गावर कसे आणतात ते दाखवले होते. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से नहीं सारखे फेमस संवाद या चित्रपटात होते.