सिनेमागृह होणार पुन्हा सुरु: केंद्र सरकारची नियमावली जाहीर

0
266

केंद्र सरकारने Unlock 5 अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनामुळे सरकारने साहजिकच यासाठी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. 15 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने चित्रपटगृह उघडण्यास परवानगी असेल. मात्र यादरम्यान सामाजिक अंतर राखावे लागणार आहे. तसेच दोन लोकांमधील सीट रिकामे ठेवावे लागेल.

गेले सहा महिने देशभरातील चित्रपटगृहं आर्थिक संकटात सापडली आहेत. आता चित्रपटगृहं उघडली जाणार असल्यानं त्यांना हुरुप आला आहे. महाराष्ट्रात अद्याप राज्य सरकारकडून चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु, नोव्हेंबरमध्ये तरी हे चित्र बदलेल अशी आशा व्यक्त केली जातेय. सिनेमांचं आर्थिक गणित आणि लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता चित्रपट व्यवसाय पुन्हा रूळांवर येण्यासाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागू शकते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

काय आहेत सिनेमागृहांसाठी नियमावली:-

  • चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा.
  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार.
  • प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही.
  • प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य
  • रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक.
  • चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.
  • चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल.
  • चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला द्यावा.
  • चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.