ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे…या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता.१३ मे ला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे.
‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’ च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत
अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.स्वरूप स्टुडिओजने लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.
13 मे रोजी ‘धर्मवीर’ हा चित्रपट तब्बल चारशेहून अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.