चित्रपट, मालिकांच्या शूटिंगसाठी केंद्राकडून नवी नियमावली

0
276

 

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली.  चित्रपट निर्मिती करताना शूटींगच्या दरम्यान काय काय काळजी घ्यावी लागेल. त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट आणि मालिका  निर्मिती संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि आदर्श नियमावली जाहीर केली. जावडेकर म्हणाले की प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे चित्रिकरणाचे काम सोपे होईल आणि करोना विषाणू उद्रेकाची झळ बसलेल्या चित्रपट निर्मितीतील कामगारांचे काम सुरू होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाशी चर्चा केल्यानंतरच चित्रिकरणासाठी आदर्श नियमावली जारी करण्यात आली, असेही जावडेकर यांनी सांगितले.

यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. कोरोनाचा फैलाव रोखणे हा या SOP मागचा उद्देश आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शूटींगचे काम आता सुरू करता येईल. यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्याचरोबर मास्क परिधान करावे लागेल. शूटिंग करताना फक्त जे दोन लोक कॅमेऱ्यासमोर आहेत. त्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

 

नियोजनात्मक निर्बंध

  • प्रत्येकाने आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करावा.
  •  चित्रिकरणस्थळी चित्रिकरणापासून सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची जेवण, नाश्ता अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे नियोजन करणे आवश्यक.
  • चित्रिकरणाच्या वेळी  कमीत कमी कर्मचारी उपस्थित असतील, याची दक्षता घेणे गरजेचे.
  •  चित्रिकरणस्थळी पाहुणे आणि प्रेक्षकांना भेटता येणार नाही. चित्रिकरणस्थळी गर्दी होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवणे आवश्यक.
  •  चित्रिकरणस्थळे आणि कामांच्या ठिकाणी आगमन आणि निर्गमन मार्ग निश्चित करणे अनिवार्य. चित्रिकरणापूर्वी आणि नंतर निर्जंतुकीकरण आवश्यक.
  •  सेट्स, उपाहारगृहे, रंगभूषा खोल्या, संकलन खोल्या, व्हॅनिटी व्हॅन्स आदींचे नियमितपणे निर्जंतुकीकरण गरजेचे.
  •  स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हातमोजे, बूट, मुखपट्टय़ा, पीपीई संच यांचा वापर करावा.
  •  शक्य असेल तर आणि तेव्हा घरातून काम करावे.
  •  वेशभूषा साधने, विग्ज, रंगभूषेचे साहित्य, साधने यांचा कमीत कमी सामायिक वापर करावा.
  •  रंगभूषाकार, केशभूषाकारांनी काम करताना पीपीई संच वापरावेत.
  •  सामायिक साधने आणि साहित्य हाताळणाऱ्या तंत्रज्ञांनी एकदा वापरून फेकण्याचे हाजमोजे वापरावेत.

 

प्रतिबंधात्मक उपाय

* संसर्गाची जोखीम अधिक असलेले ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती आणि आजारी कर्मचाऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी. लोकांशी थेट संपर्क टाळावा

*  कंपन्यांनी कार्यालयांची प्रवेशद्वारे आणि चित्रिकरणासारख्या* कार्यस्थळी सॅनिटायझरबरोबरच साबण आणि पाण्याची व्यवस्था करावी.

* कर्मचाऱ्यांनी साबण आणि पाण्याने वारंवार किमान ४०-६० सेकंद हात धुणे आवश्यक. कामाच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे मज्जाव.

* चित्रिकरण स्थळे, ध्वनिमुद्रण स्टुडिओ आणि संकलन खोल्यांमध्ये  बसताना, बोलताना एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर राखणे आवश्यक.

चित्रपटनिर्मिती क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. त्यावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या निर्णयाची राज्य सरकारे अंमलबजावणी करतील – प्रकाश जावडेकर, माहिती आणि प्रसारण मंत्री