लग्नात नवरदेवाचे बूट लपवणं असो प्रत्येक सोहळा साजरा करण्याची हौस, ‘हम आपके है कौन’ चित्रपटाने सगळंच प्रेक्षकांना शिकवलं. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट अजूनही जेव्हा टीव्हीवर लागतो तेव्हा प्रेक्षक तो आवर्जून पाहतात तेही कुटूंबीयांसोबत. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला पडलेलं एक गुलाबी स्वप्न आहे. गुलाबी यासाठी की हा चित्रपट प्रेमाने ओतप्रोत भरला आहे. या चित्रपटातल्या पात्राचं प्रत्येकावर निरातिशय प्रेम आहे. ते दाखवण्याची संधी ते सोडत नाही. अशा या प्रेमळ चित्रपटाला 2६ वर्ष पूर्ण झाले आहे.
5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात आजचा सुपरस्टार सलमान खान, धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, रेणुका शहाणे, आलोकनाथ, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिका विसरणं केवळ अशक्य असल्याचं मत पाहायला मिळते. या चित्रपटानं तेव्हा पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळवले होते.
या मल्टीस्टारर सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अगदी सिनेमातील ‘टफी’ हा कुत्रा सुद्धा भाव खाऊन गेला. ‘हम आपके है कौन’ मध्ये एकूण 14 गाणी होती. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा 14 गाण्यांमुळे या सिनेमाला ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवलं गेलं होतं. परंतु या सिनेमाने आणि सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात ही गाणी आजही ऐकू येतात.
लग्नसोहळा म्हटलं की लोकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतीय समाजाची हीच नस सूरज बडजात्यांनी ओळखली आणि सोहळे नव्याने साजरे करण्याच्या पद्धतींची ओळख करून दिली. कोणताही खलनायक नसलेल्या, मारामारी, हिंसाचारापासून दुर असलेल्या या चित्रपटाने या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले, अनेक विक्रम मोडले. फॅमिली ड्रामाच्या पलीकडे या चित्रपटात फारसं काहीच नव्हतं. पण भारतीय चित्रपटाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा हम आपके है कौनच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण असेल.
बॉक्स ऑफिसवर एक अब्जांपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून ‘हम आपके है कौन’ची ओळख आहे. या सिनेमाच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया.
- 5 ऑगस्ट 1994 रोजी मुंबईतल्या लिबर्टी सिनेमामध्ये या ‘हम आपके है कौन’चा प्रीमियर दणक्यात पार पडला. त्यानंतर त्याच थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 100 आठवडे हाऊसफुल गर्दीत चालला.
- ‘हम आपके है कौन’.. 25 वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमाने लोकप्रियतेच्या सगळ्या कक्षा तोडल्या. हाऊसफुल गर्दी खेचणारा हा सिनेमा 100 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला सिनेमा मानला जातो.
- बॉक्स ऑफिसवर ‘हम आपके है कौन’नने अक्षरश: कहर केला. या सिनेमाची तब्बल साडेसात कोटी तिकीट्स विकली गेली.
- 1996 पर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा म्हणून ‘हम आपके है कौन’चं नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलं.
- 1982 साली राजश्री प्रॉडक्शन्सने ‘नदिया के पार’ नावाचा सिनेमा बनवला. ज्यात सचिन पिळगांवकर मुख्य भूमिकेत होते. त्याच सिनेमाचा आधार घेत 1994 मध्ये जो सिनेमा आकाराला आला, तो म्हणजेच ‘हम आपके है कौन’
- सुरज बडजात्या या सिनेमाच्या कथेवर तब्बल 21 महिने काम करत होते. 21 महिन्यांच्या मेहनतीनंतर या सिनेमाची गोष्ट लिहून पूर्ण झाली.
- हम आपके है कौन’ या सिनेमाची गाणी जबरदस्त लोकप्रिय झाली. एवढी की या सिनेमाच्या तब्बल सव्वा कोटी ऑडिओ कॅसेट्स विकल्या गेल्या.
- या जबरदस्त यशामागे होतं एक मराठमोळं नाव रामलक्ष्मण. म्हणजेच विजय पाटील. रामलक्ष्मण यांनी ‘हम आपके है कौन’ची गाणी संगीतबद्ध केली. या गाण्यांसाठी दिग्दर्शकासोबत त्यांची जवळपास 50 सेशन्स पार पडली.
- ‘हम आपके है कौन’ सिनेमाने त्यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येसुद्धा बाजी मारली. सर्वात लोकप्रिय सिनेमा म्हणून ‘हम आपके है कौन’ची निवड करण्यात आली.
- बॉलिवूडमधला महत्वाचा मानला जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘हम आपके है कौन’ने 12 नामांकनं पटकावली, ज्यातल्या पाच पुरस्कारांवर या सिनेमाने नाव कोरलं.
- ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना फिल्मफेअर घोषित करण्यात आला, पण त्यावेळी लतादीदींनी पुरस्कार घेणं बंद केलं होतं. मात्र या गाण्यावर चाहत्यांनी केलेल्या प्रेमाची भरपाई म्हणून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं.
- हम आपके है कौन’ने दक्षिण भारताचीही स्वारी केली. ‘प्रेमालयम’ या नावाने हा सिनेमा तेलुगू भाषेत रिलीज झाला. तिथेही तो 25 आठवडे हाऊसफुल चालला.
- केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांना ‘हम आपके है कौन’ने भूरळ पाडली. लंडनमधल्या बेलेव्ह्यू थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 50 आठवडे चालला. गंमत म्हणजे निर्मात्यांनी हे थिएटर केवळ तीन आठवड्यांसाठी बूक केलं होतं.
- टोरांटोमध्येही ‘हम आपके है कौन’ची जादू पाहायला मिळाली. इथल्या या सिनेमाने 75 आठवडे पूर्ण केले. जे त्या काळात अनेक हॉलिवूडपटांनाही जमलं नव्हतं.
- या सिनेमाने त्याकाळी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा त्याकाळातील पहिला हिंदी सिनेमा होता.