हर हर महादेव : पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना; मराठीसह ‘या’ चार भाषेत होणार चित्रपट प्रदर्शित

0
411

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना! महाराजांचा हाच महिमा ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या या टीझरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हर हर महादेव या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात भगव्या झेंड्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. “सह्याद्रीला पूर्व एकच, अटकेपार सूर्य एकच, अखंड स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींचा शिवमंत्र एकच…हर हर महादेव”, अशा ओळी या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच दिवशी मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून. याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं . आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत त्यामुळे आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.”

अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. त्यासोबतच ते हा चित्रपट दिग्दर्शितही करत आहेत. येत्या दिवाळीमध्ये हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.