बिग बॉस सिजन १४: जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की काय आहे?

0
289

सध्या बिग बॉसचा १४ व्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धक आणि त्यांची भाषा यामुळे बाहेर गदारोळ मांडला आहे. प्रसिद्ध गाय कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू बिग बॉसच्या १४ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्यानं मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला आहे.

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजन वक्तव्य त्याने केलं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्रात राहून देखील त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो? असा संतप्त सवाल केला जात आहे. जान कुमार सानू बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी जान कुमारने तिला मराठी बोलण्यापासून रोखलं. शिवाय मराठी भाषेवर टीके देखील केली. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस मराठी ऐकताच मला राग येतो असे वक्तव्य केले.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला’, असं खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,’ असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.

महेश टिळेकर यांनी देखील एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूबाबत संताप व्यक्त केला.