बर्थडे स्पेशल: अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस

0
576

आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय तारका मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड येथे 17 मे 1979 मध्ये मुक्ताचा जन्म झाला. एका मध्यामवर्गीय कुटुंबात तिचं बालपण गेलं. वडिल टेलिकॉम कंपनीमध्ये जॉब आणि आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या. शालेय जीवनात मुक्ता अनेक नाटकात सहभागी व्हायची. आणि दहावीनंतर तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं ठरवलं होतं. मुक्ताचा भाऊ सुद्धा एक व्यावसायिक कलाकार आहे.

मुक्ताला अभिनयात रस तिच्या आईमुळे निर्माण झाला . मुक्ताची आई शिक्षिका असण्यासोबतच एक लेखिकासुद्धा आहेत. त्यांनी शाळेत मुलांना शिकवत असताना अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या एका नाटकाद्वारेच मुक्ताने पहिल्यांदा स्टेजवर अभिनय करण्यास सुरुवात केली. या संदर्भात मुक्ताने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज घरात एक खूप मोठ्ठा खजिना सापडला. माझ्या आईने लिहिलेली नाटकं. माझी आई पूर्वी शिक्षिका होती. शाळेतल्या मुलांसाठी तिने भरपूर नाटकं लिहिली , बसवली, पारितोषिकं मिळवली. लहान मुलांना आवडतील, कळतील अशा भाषेत तिने इतक्या विविध विषयांवर ही नाटकं लिहिली आहेत. मी आजही वाचताना रमुन गेले. काय मज्जा ! आईमुळेच आणि तिने लिहिलेल्या नाटकातचं मी पहिल्यांदा स्टेज वर उभी राहिले’.

मुक्ताने नाटकांपासूनच आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती. 1996 साली तिने पहिल्या व्यावसायिक नाटकात काम केलं. ‘घर तिघांचं असावं’ असं या नाटकाचं नाव होत. आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुक्ता पुणे सोडून मुंबईमध्ये गर्ल्स हॉस्टेलला येऊन राहिली. 1999 मध्ये ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. तिचं पहिलं नाटक होतं ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’ आणि तिचा पहीला चित्रपट होता 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘चकवा’ त्यासाठी तिला पदार्पणातच पुरस्कार मिळाला.

थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई – 2, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले. मुक्ता नुकतीच स्माईल प्लिज या चित्रपटात झळकली होती. तर त्यासाठी तिला फिल्मफेअर मराठी ही पुरस्कार देखिल प्राप्त झाला आहे. मागील वर्षी मुक्ता “देवी” या शॉर्टफिल्म मध्ये दिसली होती. त्यातील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं.

मुक्ताला तिच्या अभिनयासाठी अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाले आहेत. पण ‘जोगवा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मुक्ता खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. सतिश राजवाडे यांच्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटातील मुक्ता आणि स्वप्निल जोशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, आणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत..आणि आजही मुक्ता प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भुरळ पाडत आहे.

मुक्ताने एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज मुक्ताचा वाढदिवस असल्याने तिला देसी डोकंच्या टीमकडून वाढदिवसाच्या आणि तिच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.