भावपूर्ण गाण्यांपासून ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत.
सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनयातही चुणूक
लव्हबर्डस् या थ्रिलर मराठी नाटकाचे पार्श्वसंगीतही नरेंद्र भिडे यांनी दिले होते. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते.
नरेंद्र भिडे यांचे गाजलेले चित्रपट –
‘सरसेनापती हंबीरराव’ (आगामी), ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुरे’, ‘पाऊलवाट’, ‘अनुमती’ , ‘दिल ए नादान’ (बायोस्कोप), ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘शासन सिंहासन’, ‘चौदहवी का चाँद’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘आघात’, ‘शेवरी’, ‘रमा माधव’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, ‘मालक’, ‘मसाला’, ‘समुद्र’, ‘चाँद फिर निकला’ (हिंदी) याशिवाय ‘श्वास’, ‘सरीवर सरी’, ‘माती माय’ सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत.
नाटके-
‘कोण म्हणत टक्का दिला?’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘चिरंजीव आईस’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘जोडी तुझी माझी’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘गोडी गुलाबी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘लव्ह बर्डस’ , ‘व्हाईट लिली अँड नाईट रायडर’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’, ‘छापा काटा’, ‘आषाढातील एक दिवस’, ‘संगीत गर्वनिर्वाण’,
मालिका –
‘अवांतिका’, ‘ऊन पाऊस’, ‘साळसुद’, ‘घरकुल’, ‘मानो या ना मानो’, ‘पळसाला पाने पाच’, ‘भूमिका’, ‘पेशवाई’, ‘नूपुर’, ‘अबोली’, ‘श्रावण सरी’, ‘सुर – ताल’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘फुकट घेतला शाम’, ‘अमर प्रेम’.