मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक टीझर यापूर्वीच रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता लागली होती.
नागराज मंजुळेनं आपल्या सोशल मिडीया हँडलवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे, ही विशेष बाब. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरनं चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखांच्या अंदाजानंतर आता अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला आहे.
बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘कोविडनं आपल्याला अनेक झटके देत मागे आणलं. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण अखेर त्या दिवसांमध्ये परतलो आहोत…..’. बिग बींच्या या पोस्टनंतर अनेकांनीच कमेंट बॉक्समध्ये चित्रपटाच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्य घटनेवर आधारित सिनेमा
बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.
ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.