बॉलिवूडमधील महाराष्ट्राचा चेहरा हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

0
244

‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रत्येक तरूणाप्रमाणे निशिकांत यांचंही सिनेमावर अतीव प्रेम होतं. निशिकांत यांनीही सुरुवातीच्या काळात अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. भविष्यात त्यांचं हे स्वप्न पूर्णही झालं. २००४ मध्ये आलेल्या हवा आने दे सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी दृश्यम, मदारी, फुगे या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर मराठीतील डोंबिवली फास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी २००५ साली आपल्या दिग्दर्शनाच्या करिअरला सुरुवात केली होती. तसेच सातच्या आत घरात, रॉकी हँडसम, जुली २, मदारी, भावेश जोशी सुपर हिरो या सारख्या चित्रपटांमधून अभिनय देखील केला होता.

डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली. त्यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘लय भारी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली होती. ‘सातच्या आत घरात’, या चित्रपटातून त्यांनी साकारलेला ‘अनिकेत’ बराच गाजला होता. २०२२ साली त्यांचा ‘दरबदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित होतं. तसेच सिनेमांशिवाय आगामी रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही प्रोग्रामचेही निशिकांत निर्माते होते.

दृश्यममुळे निशिकांत कामत प्रकाशझोतात आले

२०१५ मध्ये आलेल्या दृश्यम सिनेमामुळे निशिकांत कामत लाइमलाइटमध्ये आले. निशिकांत यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यानंतर २०१६ मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.