इथे केलेला कचरा सोबत घेऊन जा; गोवा सरकार ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ला बजावणार नोटीस

0
301

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ कंपनीला गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘गोव्यात प्रत्येकाचं स्वागत आहे. इथे शूट करा पण त्यासोबत केलेला कचरा इथून घेऊन जा’, अशा शब्दांत गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी करण जोहरला दम दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार गोव्यातील (Goa) एका गावामध्ये दीपिका पादुकोण स्टारर फिल्मच्या क्रूने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, प्लास्टिकची भांडी तसेच वापरलेली पीपीई किट अशीच कचऱ्यासारखी फेकून दिली होती. क्रूच्या अशा गैरजबाबदार वागणुकीमुळे परिसरातील लोक पर्यावरणाबाबत चिडले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे (Karan Johar) प्रॉडक्शन करीत आहे. आता फिल्ममेकर करण जोहरची प्रॉडक्शन कंपनी धर्मा प्रॉडक्शन (Dharma Productions) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गोवा सरकारने फिल्म निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला माफी मागण्यास सांगितले आहे. जर कंपनीने असे केले नाही तर, प्रॉडक्शन हाउसला दंड आकारला जाईल, असे सांगितले आहे.

गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकेल लोबो यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धर्मा प्रॉडक्शनच्या संचालकांनी किंवा मालकांनी जागोजागी कचरा टाकल्याबद्दल आणि परिसर अस्वच्छ केल्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी.

या वादामध्ये अभिनेत्री कंगना रनौतने उडी घेतली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत तिने ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ती म्हणते, ‘चित्रपट उद्योग हा देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेसाठीच एक विषाणू नाही, तर आता हा उद्योग पर्यावरणासाठीही खूप धोकादायक बनला आहे. प्रकाश जावडेकर या तथाकथित बड्या प्रॉडक्शन हाऊसची बेजबाबदार, भयानक वागणूक पहा आणि कृपया मदत करा.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1321054970687320064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1321054970687320064%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fdharma-productions-should-apologize-or-face-penalty-goa-governments-warning-to-karan-johar-check-out-whats-the-matter-189311.html

दरम्यान, धर्मा प्रॉडक्शनकडून नियुक्त केलेल्या लाईन प्रोड्युसरने याबाबत सांगितले, ‘ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या स्थानिक कंत्राटदाराकडून दररोज कचरा उचलण्यात येतो, मात्र फक्त रविवारीच तो उचलला गेला नाही व त्याच वेळी हे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले.’