मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

0
335

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेने देखील प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं. एवढंच नाही तर ‘महाराष्ट्राची जत्रा’ कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना पोट धरुन हसण्यास भाग पाडले. त्यांचं ‘मोरुची मावशी’ हे नाटक विशेष गाजलं. याशिवाय या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं. एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यासोबतच ‘होल्डिंग बॅक’ (२०१५), ‘मेनका उर्वशी’ (२०१९), ‘थँक यू विठ्ठला’ (२००७), ‘1234’ (२०१६) आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती. मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते.

प्रदीप पटवर्धन यांची एक आठवण

विशेष म्हणजे गोविंदाच्या काळात प्रदीप यांना डान्स करण्यासाठी खास बोलावलं जायचं. आज सलमान- शाहरुखला पाहण्यासाठी जेवढी गर्दी होते त्याहून जास्त गर्दी प्रदीप यांचा डान्स पाहण्यासाठी व्हायची असं विजय पाटकर कार्यक्रमात म्हणाले होते. सगळे रस्ते, गॅलरी प्रदीपला पाहण्यासाठी खच्चून भरलेल्या असायच्या. यावर बोलताना प्रदीप म्हणाले होते की, ‘मला गोविंदामध्ये नाचायला खूप आवडायचं. त्यातही बँजोवर नाचण्यापेक्षा मला कच्छी बाज्यावर नाचायला खूप आवडतं. ही आवड मी अजूनही जपली आहे. एकदा गिरगावात गोविंदामध्ये नाचत असताना अचानक एका चौथ्या मजल्यावरून एक पिशवी माझ्यासाठी खाली आली होती, ज्यात माझ्यासाठी जिलेबी आणि बर्फी होती.’