नाट्यप्रेमींसाठी गुडन्यूज: १०० रुपयांमध्ये तिकीट… सहकुटुंब नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामलेंचा निर्णय

0
319

मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असं म्हणताना मराठी नाटकांकडे मात्र दुर्लक्ष होतं. मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी जितका उत्सुक असतो तितकाच तो मराठी नाटक पाहण्यासाठीही उत्सुक असतो. परंतु, नाटकांची न परवडणारी तिकिटं त्याला नाट्यगृहांमध्ये जाण्यापासून अडवतात. सहकुटुंब नाटकाला जाणं हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला न परवडण्यासारखं आहे. सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी जाणं म्हणजे एक हजारांहून अधिक खर्च तर केवळ तिकीटांवर होतो. हीच अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय.

यासंबंधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं, ‘अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणुनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी रु ३०० आणि रु २०० होता. तो आता मी रु १०० ठेवीन.’ त्यांच्या या निर्णयाचं नाट्यप्रेमींनी कौतुक केलं आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं’ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.

हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” अशा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.