रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
305

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवून अगदी पहिल्या पर्वा पासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठले. लॉकडाऊनमुळे शूट बंद असल्याने ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत नव्हती पण लवकरच शूट सुरू होऊन या महिन्यात ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार असे संकेत मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी दिले होते. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण 16 ऑगस्ट पासून रात्री 11 वाजता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत लागलेल्या निर्बंधांमुळे मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. इतर मालिकांनी चित्रीकरणासाठी परराज्यात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत दाखवण्यात येणारी कथा नाईक वाड्याभोवती फिरत असल्याने इतर ठिकाणी चित्रीकरण करणं निर्मात्यांसाठी शक्य झालं नाही. परंतु, आता पुन्हा एकदा निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नाईकवाडा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे नवे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

झी मराठीवर प्रचंड गाजलेली मालिका ‘देवमाणूस’ येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेचा दोन तासांचा महाएपिसोड दाखवण्यात येणार आहे. तर १६ ऑगस्टपासून ‘ती परत आलीये’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका देखील १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मालिकेत कोणकोणते नवे ट्विस्ट दाखवण्यात येणार आणि पुढे कथा कशी रंगत जाणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.