ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

0
244

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला अनेक तासांच्या चौकशीअंती अटक केली आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. गेले दोन दिवस तिची दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आजच्या पाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला आरोग्य तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.

रियाचा भाऊ शोविकलाही चार दिवसांपूर्वी अटक

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला चार दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरु आहे. गेल्या आठ दिवसात एनसीबीने केलेली ही दहावी अटक आहे. त्यापैकी तिघा जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.