ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अखेर रियाला जामीन मंजूर

0
280

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. रियासह सुशांतचे कर्मचारी सॅम्यूल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण हायकोर्टाने रियाचा भाऊ शौविक यांचा जामीन फेटाळला आहे.

रिया जवळपास एका महिन्यानंतर जेलबाहेर पडणार आहे. रियाच्या जामीन याचिका आज मुंबई हायकोर्टाने स्वीकारली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं असा आदेश देण्यात आला आहे.

एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या आदेशाविरोधात अपिल करता यावे यासाठी एक आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, रियाला जामीन मंजूर करताना आधीच अनेक कठोर अटी लावलेल्या आहेत त्यामुळे विनंती मान्य करणार नाही, असे स्पष्ट करून एनसीबीची विनंती न्यायमूर्तींनी फेटाळली.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आलं होतं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.