बर्थडे स्पेशल; चॉकलेट बॉय मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस

0
493

लहानपणी कृष्ण होऊन तर, मोठेपणी रुपेरी पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून विशेष लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकेतील अभिनयानं स्वप्निलनं आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा असून मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेटे हीरो म्हणून त्याची ओळख आहे.

१८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली.

स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ , ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ,‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘दुनियादारी’ यांमधील स्वप्निलच्या भूमिका विशेष गाजल्या.

दुनियादारी’ ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली. ‘तु ही रे’, ‘मितवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटांनी तर त्याच्या चाहत्यांना मनोरंजनाची अनोखी मेजवानीच दिली. हरे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत स्वप्नील हा आघाडीचा अभिनेता आहे.

चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला छेद देण्याचा स्वप्निल प्रयत्न करत असून सध्या विविधांगी भूमिका साकारतोय. समांतर वेबसिरीज मधून गंभीर भूमिका साकारून स्वप्नील जोशीने त्याच्या अभिनयाचे अष्टपैलू गुण दाखवून दिले.

स्वप्नील जोशीला त्याच्या भावी वाटचालीसाठी आणि त्याच्या करिअरसाठी देसी डोकंच्याटीमकडून खूप खूप शुभेच्छा…!!