नवनवीन मालिकेंचे पर्व; सुबोध भावे आणि भरत जाधवचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

0
242

मार्च महिन्यापासून करोनाचं संकट सुरू झाल्यावर मनोरंजनविश्वही ठप्प झाले होते. आता मात्र अनलॉक दरम्यान सर्व काही सुरळीत सुरु झाल्यानंतर मनोरंजनविश्वा मध्ये भर पडू लागली आहे.अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व वाहिन्यांनी कंबर कसली आहे. पूर्णपणे कात टाकत टीव्ही माध्यमावर नव्याची नवलाई दिसून येतेय. अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत, तर काही लवकरच येत आहेत.

टीव्हीवर पुनरागमन:-

नुकतीच छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाइन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेची ही पहिलीच मालिका आहे. शुभमंगल ऑनलाईन मालिकेमधून सुयश टिळक, सायली संजीव, सुकन्या मोने भेटीला आले आहेत. तसेच आता सुबोधच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, ”मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एका नव्या रुपात तुमच्या समोर येतोय, #चंद्रआहेसाक्षीला, लवकरच.”

तसेच सर्वाचा लाडका भरत जाधवही छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही कौटुंबिक मालिका देणारा दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा मालिकेचं दिग्दर्शन करणार आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ ही त्याची नवीकोरी मालिका लवकरच सुरू होणार आहे. भरत जाधवही यानिमित्तानं बऱ्याच वर्षांनी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे निर्माता म्हणून मालिकाविश्वात प्रस्थापित झालाच आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या नव्या मालिकेच्या निमित्तानं तो पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत दिसतोय.

जय जय स्वामी समर्थ आणि सख्खे शेजारी या अजून दोन मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी रसिकांना आता एकप्रकारची फ्रेश आणि आनंददायी मेजवानी मिळणार आहे.