रुपेरी पडद्यावरचा बादशहा दिलीप कुमार यांचे निधन

0
258

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षाचे होते. गेल्या महिन्याभरापासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो होत्या. सायरा बानो दिलीप कुमारची खास काळजी घेत होत्या. तसेच चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र आज दिलीप कुमार त्यांची प्राण ज्योत मावळली. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे पहिले नाव युसूफ खान होते. नंतर त्यांना दिलीप कुमार म्हणून पडद्यावर प्रसिद्धी मिळाली. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून दिलीप कुमार यांनी आपले नाव बदलले. त्यानंतर प्रेक्षक देखील त्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखू लागले. १९४४ साली त्यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिलीप कुमार यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. परंतु त्यानंतर अभिनेत्री नूर जहांबरोबरची त्यांची बॉलिवूडमधील सुपर हिट जोडी ठरली. ‘जुगनू’ हा चित्रपट दिलीप कुमार यांचा पहिला सुपर हिट चित्रपट ठरला. यानंतर दिलीप कुमार यांचे एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ऑगस्ट १९६० मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट त्यावेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट होता.

दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली.  1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे. 1944 साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ‘ज्वार भाटा’ (1944), ‘अंदाज’ (1949), ‘आन’ (1952), ‘देवदास’ (1955), ‘आझाद’ (1955), ‘मुगल-ए-आजम’ (1960), ‘गंगा’ जमुना (1961), ‘क्रांती’ (1981), ‘कर्मा’ (1986) आणि ‘सौदागर’ (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.