मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

0
276

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्कानं गुरूवारी सकाळी दहा वाजता निधन झालं. अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती. 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यापूर्वी ते नाटकांतून काम करत होतेच. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती. अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते.

अविनाश खर्शीकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. मात्र, अनोख्या शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. 90च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.