मुरलीधरनचा बायोपिक ‘800’ मधून विजय सेतूपतीची माघार

0
214

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या मुथ्थया मुरलीधरनच्या जीवनावर आधारीत या चित्रपटामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाला जोरदार विरोध सुरू झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून विजय सेतूपतीला चाहत्यांच्या आणि तमिळ भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

विजय सेतुपतीने ‘थँक्यू .. बाय…’ असे लिहित मुथ्थया मुरलीधरनं लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात मुथ्थया मुरलीधरनं विजय सेतुपतीला ‘८००’ चित्रपटातून माघार घेण्याची विनंती केली आहे. तमिळनाडूच्या या महान कलाकाराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच विजय सेतूपती यांनी या चित्रपटातून बाहेर पडावे अशी माझी इच्छा आहे, असं मुरलीधरन यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

काय म्हणाला मुरलीधरन?

मुरलीधरनने म्हटले आहे की, “काही लोकांमध्ये गैरसमज असल्यामुळे माझा बायोपिक असलेला चित्रपट ‘800’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही लोक अभिनेता विजय सेतूपतीवर चित्रपट सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. तमिळनाडूमधल्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला माझ्या चित्रपटामुळे कोणताही त्रास झाला तर मला ते चालणार नाही. त्यामुळे मी विजयला विनंती करतो की, त्याने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा. मला वाटतं की, या चित्रपटामुळे विजयच्या करिअरमध्ये कोणताही अडथळा होऊ नये. मी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाही. मी त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. ते करतच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे”.

मला आशा आहे की, चित्रपटाचे निर्माते या चित्रपटाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करतील. त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की, ते या चित्रपटाबाबत लवकरच नवी घोषणा करतील. मी त्यांच्या निर्णयासोबत असेन. कठीण प्रसंगी माझी साथ देणाऱ्या मीडिया, राजकीय मंडळी, विजय सेतूपतीचे चाहते आणि महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडूमधील जनतेचा मी मनापासून आभारी आहे.

का होत आहे विरोध?

काही दिवसांपूर्वी मुथय्या मुरलीधरननं आपली बायोपिकची घोषणा केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. मात्र तमिळनाडुमध्ये या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. सोशल मीडियावर विजय सेतुपतीला ट्रोल करण्यात येवू लागले. या विरोधाला खरंतर १९८३ ते २००९ पर्यंत श्रीलंकेत सुरू असलेल्या गृहयुद्धाची पार्श्वभूमी आहे. श्रीलंकेत तमिळ हे अल्पसंख्याक आहेत. श्रीलंकेत सिंहली लोकांकडून तमिळ लोकांवर बऱ्याच वर्षांपासून अत्याचार करण्यात येत होते. त्यामुळे झालेल्या गृहयुद्धात असंख्य तामिळींना आपला जीव गमवावा लागला होता. श्रीलंकेत तामिळी लोकांवर इतके अत्याचार झाले असताना, तिथल्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये विजय सेतुपतीने काम करणं योग्य नाही, असे काही तेथील प्रेक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान विजयला विरोध करणाऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnVijaySethupathi हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता.