Vikram Vedha Trailer :हृतिक रोशन-सैफ अली खान यांच्यात रंगली काटें की टक्कर; विक्रम वेधा’ चा धमाकेदार ट्रेलर

0
412

हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका ट्रेलरमध्ये दिसतोय. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट विक्रम-बेतालच्या पौराणिक कथेपासून प्रेरित आहे. ट्रेलरमधील हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा डॅशिंग अंदाज लक्ष वेधून घेतोय.

‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत असून, शहरी भागांसोबतच सोशल मीडियावर अविश्वसनीय प्रेम आणि कौतुक होत आहे. ‘विक्रम वेधा’मध्ये अनुक्रमे सैफ अली खान आणि हृतिक रोशन विक्रम आणि वेधा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत एका सरळमार्गी शूटिंग पोलिसाच्या व्यक्तिरेखेत जीव ओतताना दिसणार आहे, तर वेधा नावाच्या गुंडाच्या भूमिकेत हृतिक रोशन आहे.

चित्रपटाच्या टिझरने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता याच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरची सुरुवात हृतिक रोशनपासून होते. यानंतर सैफ अली खानची एक झलक पाहायला मिळत आहे. तसेच एक उत्तम पार्श्वसंगीत सुरु आहे, जे लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यानंतर हृतिक एका फाईट सीनमध्ये अॅक्शन करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सैफ अली खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या सहकार्यांच्या बरोबरीने तो गुंडांशी सामना करताना दिसत आहे. राधिका आपटे या चित्रपटात सैफच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एक वकील, सामाजिक कार्यकर्ती महिला दाखवली आहे, जी गुंडांच्या हक्कांसाठी लढताना दिसत आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना त्यांच्या ट्रेलरमधील परफॉर्मन्ससाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘विक्रम वेधा’ या अ‍ॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. ‘विक्रम वेधा’ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर पोलीस असलेला विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे. चोर-पोलिसांच्या या पाठशिवणीच्या खेळात वेधा प्रमुख कथाकाराच्या रूपात कथांच्या मालिकेद्वारे विक्रमला विचार प्रवृत्त करून नैतिक संदिग्धता सोडवण्यास मदत करतो.

गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने विक्रम वेधाह्ण हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.