झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार 2020 मध्ये ‘झी’ने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि मराठी सिनेसृष्टीतील उत्साही अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिशय जल्लोषात, सांगीतिक माहोलमध्ये या वाहिनीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. ही वाहिनी अशाचप्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सांगीतिक माहोल सादर करणार आहे. “झी वाजवा, क्षण गाजवा”, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे, कारण क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट! ही वाहिनी आपल्या सादरीकारातून प्रेक्षकांना संगीताचा अनोखा अनुभव प्रदान करणार आहे.
झी वाजवा वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या. झी वाजवा या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून ‘झी’ समूहाचं अभिनंदन केलं.
झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. या संगीत चॅनेलमुळे मराठी अल्बम असो वा एखादे मराठी रॅप गाणे यांना हक्काचे असे घर मिळणार आहे. यामुळे मराठी रसिकांना मराठी गाण्याचा आस्वाद घेता येणार हे मात्र नक्की.