अंतरा मेहता : महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट

0
326

( महाराष्ट्राची मान संपूर्ण देशात उंचावणार्‍या अंतरा मेहता यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख)

स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रांत अग्रेसर असून ती पुरुषांच्या तुलनेत अजिबात मागे राहिलेली नाही. क्रीडा, संशोधन, वैद्यकक्षेत्र, अंतराळ अशा सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अगदी रणांगणातही तिने आपले धैर्य, शौर्य सिद्ध केले आहे. भारतीय सैन्यदलात पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियांनीही मोलाची कामगिरी बजावली असून ‘शौर्य पुरस्कारां’वर आपले नाव कोरले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्त्व सिद्ध केलंच आहेत. आता महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असं त्यांचं नाव आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत.

आपल्याला मोठे होऊन देशासाठी काही तरी करून दाखवण्याची इच्छा बाळगणार्‍या अंतरा या शालेय शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही कटाक्षाने लक्ष देत होत्या. अभ्यासात हुशार असल्याने शालेय शिक्षणादरम्यानही त्यांनी उत्तम गुण मिळवत कुटुंबीयांचे मन जिंकून घेतले. अंतरा यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्येही उत्तम गुण मिळवण्याच्या सपाटा त्यांनी सुरुच ठेवला. दहावीच्या परीक्षेतही उत्तम गुण मिळवल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेतून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटू असलेल्या अंतरा यांचे प्राथमिक शिक्षण माउंट कार्मेल गर्ल्स स्कूल येथे झाले. २०१८मध्ये रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी ‘पिलेटस पीसी-7’, दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ‘किरण एमके-1’ हे लढाऊ विमान उडवले. मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे ‘हॉक्स’ या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अंतरा यांचे वडील रवी मेहता एका सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत असून आई पाळणाघर चालविते. अंतरा यांची मोठी बहीण दीपशिखा खासगी शिकवणी वर्गात कम्प्युटर सायन्स हा विषय शिकवितात.

रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली आहे. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा ही आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी. अंतराचे हे कर्तृत्व खरेच वाखाणण्याजोगे आहे. भारतीय वायुसेनेत महाराष्ट्रासाठी पहिल्या ‘महिला फायटर’ ठरलेल्या अंतराने सर्व तरुणींपुढे एक नवा आदर्श प्रस्थापित केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाट्याला लढाऊ महिला वैमानिक होण्याचा योग आला नव्हता. मात्र, अंतराच्या रुपाने महाराष्ट्राला आता पहिली महिला लढाऊ वैज्ञानिक मिळाली असून त्याचे करावे तितके कौतुक कमीच.