अनलॉक १.०: राज्यामध्ये ‘मिशन बिगीन अगेन’

0
296

(महाराष्ट्रात तीन टप्प्यात निर्बंध हटवणार)

देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु १ जूनपासून सुरु झाला आहे. लॉकडाऊनबाबत राज्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे महाराष्ट्राने लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला आहे. या लॉकडाऊनमध्ये टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यात आली आहे. ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड झोनमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी रविवारी अनेक अटी शिथिल केल्या. त्यानुसार तीन टप्प्यांत अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र काेरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही गोष्टींवर संपूर्ण राज्यात निर्बंध घातले आहेत. मॉल्स, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे व धार्मिक स्थळेसुद्धा ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महामारी साथ नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत लाॅकडाऊन शिथिल करण्यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. लाॅकडाऊनच्या – ५ पर्वास ‘मिशन बिगीन अगेन’ असे नाव दिले आहे.

टप्पा एक : ३ जून प्लंबर, गॅरेज सुरू होणार

  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी. { गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना.
  • सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीस परवानगी.
  • उद्याने, मैदानावर जॉगिंग, सायकलिंग, धावणे आदी व्यायामास परवानगी.
  • सामूहिकपणे व्यायामास मनाई असणार आहे. खुल्या मैदानात गर्दीस मनाई.

टप्पा दोन : ५ जून | दुकाने सम-विषम पद्धतीने

  • रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम आणि विषम पद्धतीने दिवसाआड सकाळी ९ ते ५ वेळेत उघडणार.
  • दुकानांत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरावेत.
  • खरेदी जवळच्या दुकानात करावी. स्वयंचलित वाहनांच्या वापरास मनाई.
  • फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम मोडल्यास दुकान बंद केले जाईल. अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा, कार, कॅबमध्ये १ अधिक २ व्यक्ती तर दुचाकीवर चालकास परवानगी.
  • खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये चालत वा सायकलने जावे.
  • अत्यावश्यक वस्तूशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई.
  • खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

टप्पा तीन : ८ जून :

  • सर्व खासगी कार्यालये १०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालवण्यास परवानगी. उर्वरित कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय घ्यावा.
  • अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी – १ चालक १ प्रवासी, रिक्षा – १ चालक २ प्रवासी, खासगी चारचाकी – १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवासाची परवानगी.

संपूर्ण राज्यात खालील बाबींवर बंदी कायम –

  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
  • मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
  • स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

उर्वरित राज्यात – (मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्र)

  • परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही
  • खुली स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत
  • स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही
  • जिल्हा अंतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
  • सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी, मात्र गर्दी आढळल्यास बंद करण्याचा इशारा