कोरोना: लॉक डाऊन म्हणजे काय असते रे भाऊ?

0
893

कोरोना व्हायरस झपाट्याने जगभरात पसरत आहे. चीनच्या वुहानपासून या विषाणूची सुरुवात झाली खरी मात्र आता या विषाणूने साऱ्या जगात दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाने शिरकाव केला असून त्याचे परिणाम सर्वसामान्यांवर दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात करोना दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झालं असून, लॉक डाऊनच्या दिशेनं पावलं पडत असल्याचं एकून उपाययोजनांवरून दिसत आहे.

संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे सरकारनं त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा, जलतरण तलाव, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. गर्दी कमी व्हावी यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे.

इटली आणि स्पेनमध्ये लागू केलेल्या ‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना शक्यतो घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. चीनमधील ज्या वुहान प्रांतातून ‘कोरोना’चा उगम झाला, तिथेही ‘लॉक डाऊन’ करण्यात आलं होतं.

लॉक डाऊन ची अशी असेल परिस्थिती
‘लॉक डाऊन’ हा पर्याय अतिशय दुर्मिळ वेळा स्विकारला जातो. यामध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे स्तलांतरीत केलं जातं किंवा घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. हा निर्णय किती कालावधीसाठी घ्यायचा हे त्या स्थितीवर अवलंबून असतं. सध्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबाबत कोणताच विचार केला नसल्याचं दिसतंय. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर ‘लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प केले जातील. लांब रस्त्याच्या बस आणि रेल्वेसेवा बंद केल्या जाऊ शकतात, किंवा फेऱ्यांची संख्या कमी करण्यात येऊ शकते. वाहतूकीवर पूर्णपणे बंदी येईल. नागरिकांना यावेळी घरामधून बाहेर पडता येणार नाही त्यांना लॉक डाऊन मध्ये घरामध्येच थांबावे लागेल. यादरम्यान वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतात. याचा सगळ्यात जास्त फटका व्यवसायिकांना बसेल. कारण अनिश्चित काळासाठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.