जागतिक लोकसंख्या दिन : काय आहे ह्या दिवसाचे महत्त्व

0
1523

जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेवून १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.

आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड,असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते, तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते. लोकसंख्येच्या बाबतीत सध्याच्या घडीला चीन पहिल्या स्थानावर तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या १.३८ अब्ज आहे. २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल. विकसित देशांमध्ये संसाधने अधिक आणि लोकसंख्या कमी आहे तर विकसनशील अविकसित देशांमध्ये संसाधने कमी आणि लोकसंख्या अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि रोजगार आदी बाबींचा विचार करता, ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही. रोबोटिक्‍स आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत कामगार, कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही, अशा वेळी या लोकसंख्येचे करायचे काय, हा प्रश्‍न उभा राहील. विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल आणि गुन्हेगारीही वाढेल. वाढती लोकसंख्या देशाची प्रगती रोखण्यास कारणीभूत तर ठरते. त्यामुळे आतापासूनच आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जेवढी लोकसंख्या वाढेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने वंचित लोकांचा आकडा वाढत जाईल. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी भारताने लोकसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या सरकारची नसून सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.

लोकसंख्येचा डेटा
जनगणनेसोबत विविध माध्यमांद्वारे लोकसंख्येविषयी डेटा जमवला जातो. उदाहरणार्थ स्त्री-पुरुष संख्येचे गुणोत्तर, जन्मदर, मृत्युदर, आरोग्य इत्यादी. या सर्व माहितीचा देशाच्या नियोजनासाठी उपयोग होतो.

वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम
बेरोजगारी : लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. साधनसंपत्तीची कमतरता भासू लागली.
रोगराई : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागले.

सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंड पुढीलप्रमाणे:

आशिया (लोकसंख्या: ४४३. ६ कोटी)

आफ्रिका (लोकसंख्या: १२१. ६ कोटी)

युरोप (लोकसंख्या: ७३.८ कोटी)

उत्तर अमेरिका (लोकसंख्या: ५७.९ कोटी)

दक्षिण अमेरिका (लोकसंख्या: ४२.२ कोटी)

ऑस्ट्रेलिया (खंड) (लोकसंख्या: ३९.९ कोटी)

आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकाने योगदाने द्यावे. जोपर्यंत जगभरातले सर्वच लोक लोकसंख्यावाढीच्या संकटाची जोखीम ओळखत नाहीत, तोपर्यंत लोकसंख्या कमी होणे शक्य नाही. येणार्‍या काळात लोक आपापली समाज आणि देशाप्रति असणारी जबाबदारी ओळखून लोकसंख्येला आळा घालतील, तोच दिवस खरा जागतिक लोकसंख्या दिवस असेल.