16 जानेवारीला साजरा केला जाणार नॅशनल स्टार्ट-अप डे; पंतप्रधान मोदींची घोषणा

0
366

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील स्टार्ट-अपसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत म्हटले की, मी देशाच्या त्या सर्व स्टार्ट-अपला, सर्व इनोव्हेटिव्ह तरुणांना खूप-खूप शुभेच्छा देतो, जे स्टार्ट-अप्सच्या जगात भारताचा झेंडा बुलंद करत आहेत. ते म्हणाले की, स्टार्ट-अपची ही संस्कृती देशाच्या दूर-दूरपर्यंत पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच इनोव्हेशनबाबतचं आकर्षण निर्माण करणं आणि इनोव्हेशनलला इन्स्टिट्यूशनलाईज करणं हा आमचा प्रयत्न आहे. 9 हजाराहून अधिक अटल टिकरिंग लॅब्समधून शाळेत इनोव्हेट करणं, नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी देण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भारतातील तरुण आज ज्या गतीने आणि मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप उभारत आहेत, ते या जागतिक महामारीच्या काळात भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. पूर्वी, चांगल्या काळात, फक्त काही कंपन्याच मोठ्या होऊ शकत होत्या. पण आता तरुण मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी स्टार्टअप उद्योगांच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. हे 2016 मध्ये स्टार्टअप इंडियाच्या प्रमुख उपक्रमाच्या लॉन्चिंगमध्ये दिसून आले. सरकारने स्टार्टअप उद्योगांच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप इको-सिस्टीमवर मोठा प्रभाव पडला आहे.

हे इनोव्हेशन, इंडस्ट्री आणि इनवेस्टमेंटचे नवे युग
पंतप्रधान पुढे म्हणाले की, हे नावीन्यपूर्णतेचे म्हणजेच कल्पना, उद्योग आणि गुंतवणूकीचे नवीन युग आहे. तुमचे श्रम भारतासाठी आहेत. तुमचा उद्योग भारतासाठी आहे. तुमची संपत्ती निर्मिती भारतासाठी आहे, रोजगार निर्मिती भारतासाठी आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करणे ही आज सरकारची प्राथमिकता आहे.