राम मंदिर भूमिपूजन: हा होता अयोध्याचा आतापर्यंतचा इतिहास

0
297

आज भारतासाठी खुप मोठा ऐतिहासिक दिवस आहे त्याचे कारण म्हणजे राम मंदिराचे भूमिपूजन.अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल.

शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, या गीतरामायणातील गीतात अयोध्या नगरीचे वर्णन करण्यात आले आहे. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी अजरामर केलेली ही कलाकृती. हे गाणे केवळ नुसते ऐकले, तरी अयोध्या नगरीचे एक सुंदर रुप आपल्या मनात अलगदपणे उमटण्यास सुरुवात होते. श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या प्रभू श्रीरामांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या. याच अयोध्येत शतकांच्या तपश्चर्येनंतर श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अद्भूतपूर्व निकाल देत श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा केला. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आली.

प्राचीन उल्लेखांनुसार, प्रभू श्रीरामांचा जन्म सप्तपुरींपैकी एक असलेल्या अयोध्येत झाला होता. सध्या शरयू नदीच्या काठावर असलेली अयोध्या उपरोक्त सप्तपुरींपैकी एक आहे. जर अयोध्या अन्य स्थळी असती, तर तिची सप्तपुरींच्या वर्णनांमध्ये उल्लेख करण्यात आला नसता आणि आजची अयोध्या एक तीर्थक्षेत्र बनली नसती. भारतातील प्राचीन नगरांपैकी एक अयोध्येला हिंदू पौराणिक इतिहासात पवित्र्य सप्तपुरींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सप्तपुरींमध्ये अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी) आणि द्वारका यांचा समावेश आहे.

जाणून घेऊया अयोध्या इतिहास:

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद १०६ वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्ट या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघालं. जाणून घेऊया  संपूर्ण घटनाक्रम.

राम मंदिर आणि बाबरीचा घटनाक्रम…

१५ व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप करण्यात आला आहे.
१५ व्या शतकात मंदिर पाडून त्या वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे
१८५३ मध्ये हिंदू संघटनांनी हा आरोप केला की राम मंदिर पाडून या ठिकाणी मशीद उभारली आहे. या आरोपावरून पहिल्यांदा देशात हिंदू मुस्लीम दंगलही झाली होती.
१८५९ मध्ये ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर तारांचे कुंपण घालून, या कुंपणाबाहेर आणि आतमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना वेगवेगळी प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली होती.
१८८५ मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयात दाखल झाले. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद (अयोध्या) येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं होते.
२३ डिसेंबर १९४९ : जवळपास ५० हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, ज्यानंतर हिंदू बांधव पूजा करू लागले, मात्र मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करणं बंद केलं होते.
१६ जानेवारी १९५० : गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात अपील करुन रामलल्लाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली
५ डिसेंबर १९५० : महंत रामचंद्र दास यांनी हिंदूंनी प्रार्थना सुरु ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली, यावेळी मशिदीला पहिल्यांदाच ‘ढाँचा’ असा शब्द वापरण्यात आला
१७ डिसेंबर १९५९ : निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टाचा दरवाजा खटखटला.
१८ डिसेंबर १९५९ : उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून न्यायलयात धाव घेतली होती.
१९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीला लावले कुलुप उघडण्यासंदर्भात आणि रामजन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा त्यावेळीच करण्यात आली होती.
१९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलुपं उघडण्यात आली मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीची स्थापना केली.
१९८९ मध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने विहिंपच्या भूमिकेला औपचारिकरित्या पाठिंबा दिला, ज्यामुळे मंदिराचे थंड पडलेले आंदोलन जोशात सुरू झाले
जुलै १९८९ मध्ये या प्रकरणातला पाचवा खटला दाखल करण्यात आला.
१९९० मध्ये भाजपाचे अध्यक्ष असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून उत्तरप्रदेशातल्या अयोध्येपर्यंत राम मंदिरासाठी एक रथयात्रा काढली, ज्यानंतर दंगली उसळल्या.
१९९० मध्ये अडवाणींना समस्तीपूरमधून अटक करण्यात आली, ज्यानंतर भाजपाने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला.
ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारने बाबरी मशिदीच्या शेजारी असलेल्या २.७७ एकर जमिनीचा ताबा घेतला
६ डिसेंबर १९९२ हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली, ज्यानंतर जातीय दंगली उसळल्या, घाईने तात्पुरत्या स्वरुपाचे एक मंदिर तयार करण्यात आले
एप्रिल २००२ : अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या मालकीच्या खटल्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी सुरू केली.

३० सप्टेंबर २०१० : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. राम मंदिर, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा या तिघांमध्ये ही वादग्रस्त जागा वाटून घेण्याचा हा निर्णय होता.

९ मे २०११ : सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.

२१ मार्च २०१७: सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी परस्पर सामंजस्यातून तोडगा काढण्याची सूचना केली.

१९ एप्रिल २०१७  : सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप आणि रा. स्व. संघाच्या काही नेत्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याचा आदेश दिला.

६ ऑगस्ट २०१९ : अयोध्येच्या खटल्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर 6 ऑगस्टपासून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी करण्यात आली.

९ नोव्हेंबर २०१९ :अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही ‘रामलल्लाची’च असल्याचा निकाल कोर्टाने दिला. मुळे या जागेवर आता राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.