स्वातंत्र दिनी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार

0
360

अमेरिकेतील एका ग्रुपने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. न्यूयॉर्क शहरातील या खास स्थानावर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून इतिहास रचण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने न्यूयॉर्कमधील या कार्यक्रमासाठी भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच तेच ध्वजारोहण देखील करणार आहेत, अशी माहिती तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए)ने दिली आहे.

भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जयस्वाल न्यूयॉर्कमधील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून इतिहास रचण्यात येणार आहे.

पर्यटकांमध्ये टाईम्स स्क्वेअर हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. जगातील सर्वात मोठे आणि आकर्षक बिलबोर्ड पैकी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर एक आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठेच्या ठिकाणी पहिल्यांदाच तिरंगा फडकणार आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमीपूजनच्या कार्यक्रमादिवशी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील आकर्षक बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचा थ्री डी फोटो झळकला होता. या व्यतिरिक्त १७ हजार चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटो प्रदर्शित केले होते. भारतीय समुदायातील लोकांनी 5 ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअरमध्ये एकत्र येऊन उत्सव साजरा केला आणि मिठाई वाटली. अमेरिका-भारताच्या सार्वजनिक संबंधांवरील समितीचे अध्यक्ष जगदीश सेव्हानी यांनी सांगितले, ‘ही एका जीवनकाळात किंवा एका शताब्दीत एकदाच होणारी घटना नसून मानवजातीच्या पूर्ण जीवनकाळात एकदाच होणारी घटना आहे. आम्ही हा दिवस उत्सावासारखा साजरा करणार आहोत आणि राम जन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजनाचा उत्सव साजरा करण्यासाठी टाइम्स स्क्वेअरपेक्षा चांगली जागा असूच शकत नाही.’

अमेरिकेत एफआयए दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रम आयोजित करते आणि यादिवशी ‘इंडिया डे परेड’ही होते. पण या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही परेड होणार नाही.