२६ जुलै कारगील विजय दिवस: जरा याद करो कुर्बानी

0
289

२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो…त्याविषयी.

राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

१९९९ मध्ये गुराख्यांनी पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती लष्कराला दिल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात ही सैनिक कारवाई करण्यात आली. मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगिल युद्ध ७७ दिवस चालले. नियंत्रण रेषेपलिकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानच्या चारी मुंड्या चीत केल्या. तेव्हापासून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.

भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.

या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती. भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या.

कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी आपले सैनिक स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे.