महात्मा गांधी जयंती आणि त्यांचे विचार

    0
    478

    अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. गांधीजी म्हटलं की सत्य, अहिंसा, सत्याग्रह हेच शब्द आठवतात. मला गांधीजींची ओळख झाली शाळेत असताना… तेव्हा त्यांची सगळीच तत्त्वं समजण्याचं वयदेखील नसतं. आपण गांधीजींच्या कडून काय शिकू शकतो हे पाहण्याची गांधी जयंती एक संधी आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आपण काय काय करावं आणि काय करू नये याची सतत शिकवण देत असते. त्याग-भाव, सर्वांचा स्विकार, सत्संग यावर अतूट श्रद्धा, देशाच्या प्रगतीसाठी सतत झटत राहण्याचे लक्ष्य आणि समाज कल्याण यासारखे गांधीजींचे आदर्श आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

    २१ व्या शतकात महात्मा गांधीजींचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत, तितकेच कालसुसंगत आहेत. जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान त्यांच्या विचारांमध्ये आहे. दहशतवाद, कट्टरतावाद, अतिरेकीवाद आणि तिरस्कार अशा समस्या आज देशांमध्ये आणि समाजात दुहीचे वातावरण निर्माण करत असताना महात्मा गांधीजींच्या शांती आणि अहिंसा या तत्वांमध्ये आजही मानवतेच्या बळावर सर्वांना बांधून ठेवायचे सामर्थ्य आहे.

    गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.

    गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे त्यांनी प्रत्येक भारतीयाला आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असल्याची भावना बहाल केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात, मग तो शिक्षक असो, वकील असो, डॉक्टर असो, शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो, या सर्वांच्या मनात स्वतःवरील विश्वासाची भावना जागवली. त्याचप्रमाणे आजही आपण गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्या सर्व पैलूंचा स्वीकार करू, अंगिकार करू. अन्नाचा शून्य अपव्यय किंवा अहिंसा आणि एकात्मतेच्या तत्त्वाचा स्वीकार अशा साध्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि हरित पर्यावरण देण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो, याचा विचार करू शकतो. सुमारे आठ दशकांपूर्वी जेव्हा प्रदूषणाची समस्या आजच्या इतकी मोठी नव्हती, तेव्हाही महात्मा गांधीजींनी सायकलच्या वापराला सुरुवात केली होती. अहमदाबादमधील अनेक जण आजही गुजरात विद्यापीठापासून साबरमती आश्रमापर्यंत गांधीजींच्या सायकल प्रवासाच्या आठवणी सांगतात.

    उत्साहाने भारलेल्या अनेक भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे सुदैव लाभले नसेल. आपण देशासाठी प्राणांची आहुती देऊ शकत नाही, मात्र आपण देशासाठी जगू शकतो आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करण्यासाठी शक्य ते सर्व करू शकतो. बापूंचे स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी संधी आज आपल्याकडे आहे. युवा पिढीने जर बापूंच्या आदर्शावर आणि विचारांवर चालायचे ठरविले तर एकीने देशाच्या विकासाच्या वाटचालीस मोठा हातभार आपण लावू शकतो.