इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कूटरमध्ये काय फरक? तुमच्यासाठी कोणती स्कूटर बेस्ट?

0
395

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहेत. देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. पण मागच्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक की, पेट्रोल स्कूटर निवडायची याबाबत ग्राहकांमध्ये गोंधळ आहे.

विक्रीचे आकडे पाहता देशात पेट्रोल स्कूटरची विक्री बाइकच्या बरोबरीची आहे. Honda Activa, TVS Jupiter आणि TVS Ntorq 125 सध्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पेट्रोल स्कूटरवर वर्चस्व गाजवत आहेत. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर्सची लोकप्रियता वाढली आहे, परंतु तरीही त्या पेट्रोल स्कूटरइतक्या विश्वासार्ह नाहीत. मात्र, तरीही इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा खर्च वाचवण्याच्या बाबतीत पुढे आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय फरक आहेत ते जाणून घेऊया.

इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे आणि तोटे

गेल्या काही दिवसात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोलवर होणारा खर्च वाचवू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा खर्च पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत खूपच कमी असतो. इलेक्ट्रिक स्कूटर प्रदूषण करत नाहीत. सध्या अनेक राज्य सरकारे आणि केंद्र सरकारही इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देत आहेत, तुम्हीही त्यांचा लाभ घेऊ शकता.

इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या तोट्यांबद्दल सांगायचं तर, इलेक्ट्रिक स्कूटर्सची सर्वात मोठी समस्या त्याच्या रेंजबद्दल आहे. तुम्ही त्याला रेंज एंजाइटी म्हणू शकता. इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी घरात जागा आवश्यक आहे किंवा जिथे पार्क कराल तिथे इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्याची सोय असावी. सध्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जेथे वीज पुरवठा व्यवस्थित नाही, तेथे इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करणे फार कठीण आहे.

सामान्यतः इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा महाग असतात परंतु सबसिडीमुळे किंमत कमी झाली आहे. पेट्रोल स्कूटर विकत घेणे स्वस्त आहे पण त्या चालवण्याचा खर्च जास्त आहे. त्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा आणि देखभालीचा खर्च कमी आहे. याचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजिन नसते आणि भागांना कमी देखभालीची आवश्यकता असते.

पेट्रोल स्कूटरचे फायदे आणि तोटे

पेट्रोल स्कूटरला मायलेजची चिंता नाही. सर्वत्र पेट्रोल पंप उपलब्ध आहेत. तुम्ही स्कूटरची टाकी कुठूनही रिफिल करू शकता आणि स्कूटर वापरू शकता. जिथे वीज पुरवठा व्यवस्थित नाही, तिथेही तुम्ही गाडीचा वापर करू शकता. कारण देशात पेट्रोल पंपांचे चांगले नेटवर्क आहे आणि तुम्हाला फक्त त्यांच्यासाठीच पेट्रोल हवे आहे.

पेट्रोल स्कूटरचे तोटे सांगायचे तर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत त्यांचा वापर करणं महाग आहे, त्यांची सर्व्हिसिंग देखील महाग आहे आणि प्रदूषण देखील होतं.

पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे आणि तोटे जाणून घेतल्यानंतर, आता सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्ही कोणती स्कूटर खरेदी करावी. तुम्हाला स्कूटर कशी वापरायची आहे याचे सोपे उत्तर आहे. जर तुम्ही मोठ्या शहरात रहात असाल आणि तुम्हाला दररोज ठराविक अंतरासाठी स्कूटर वापरायची असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी अधिक चांगली असेल. याशिवाय, जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्याची व्यवस्था असेल तर नक्कीच तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त महत्त्व दिले पाहिजे.