Republic Day violence: लाल किल्ल्यावर आंदोलनाचा झेंडा फडकावणारा तरुण आहे तरी कोण?

0
315

प्रजासत्ताक दिनाला (Republic Day violence) आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा युवक नेमका कोण होता हा प्रश्न अनेकांना पडला. आता याबद्दलची महत्तवपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या व्यक्तीचं नाव जुगराज सिंग असून तो पंजाबच्या तरणतारण गावचा रहिवासी आहे. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवरील व्हिडिओ पाहून कुटुंबीय आणि गावातील लोकांनी त्याला ओळखलं आहे. ही बातमी पाहिल्यानंतर जुगराज सिंगचे वडील बलदेव सिंग, आई भगवंत कौर आणि आपल्या तिन्ही मुलींना घेऊन कुठेतरी निघून गेले आहेत.

23 वर्षांचा जुगराज सिंह
जुगराज सिंह हा 23 वर्षांचा तरुण पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यातील रहिवाशी. याच जुगराजने 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होऊन, लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवला होता.

जुगराजच्या आजोबांना याबाबत विचारलं असता, नातवाच्या पराक्रमावर शेतकरी आजोबाला अभिमान आहे. “मला खूपच अभिमान आहे, ये बाबे दी मेहर है अर्थात गुरुंची कृपा आहे” असं ते म्हणाले.

आजोबा महल सिंह यांनी जुगराज हा खूप चांगला मुलगा असल्याचं सांगितलं. जी घटना घडली तो नेमका काय प्रकार होता, हे आपल्याला माहिती नाही. मात्र आयुष्यभरात जुगराजने आपल्याला कधीही तक्रारीची संधी दिली नाही, असं महलसिंह सांगतात.

जुगराजच्या गावकऱ्यांचं म्हणणं काय?
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी अनेकवेळा जुगराजच्या घरावर छापेमारी केली आहे. मात्र त्यांना प्रत्येकवेळी रिकाम्या हातीच परतावं लागलं. कारण जुगराज आणि त्याचे आई-वडील गावात नाहीत. बहुतेक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जुगराज एक मेहनती आणि प्रामाणिक मुलगा आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जुगराज सिंगचे आजोबा महिल सिंग आणि आजी गुरचरण कौर यांनीदेखील लाल किल्ल्यावर केशरी झंडा फडकवणारा जुगराज सिंगच असल्याचं ओळखलं आहे. जुगराज सिंगचे कुटुंबीय बॉर्डर लगत असणाऱ्या जमीनीवर शेती करतात. जुगराज सिंगच्या परिवाराने सांगितलं, की त्यांच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

जुगराज हा 23 की 24 जानेवारीला दिल्लीला गेला. त्यानंतर तो गावकऱ्यांना थेट टीव्हीवरच 26 जानेवारीला दिसला. लाल किल्ल्यावरील खांबावर चढलेला जुगराज आहे हे अनेकांनी ओळखलंही नाही. जुगराज एक साधा मुलगा आहे. त्याला कुणीतरी भडकवलं असेल. त्यामुळेच त्याने लाल किल्ल्यावर चढून झेंडा लावला असावा, असं गावातील जगजीत सिंह सांगतात. या आंदोलनाला परदेशातून फंड मिळत असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

गावातील लोकांचं म्हणणं आहे, की आम्हाला वारंवार असं सांगितलं गेलं, की ट्रॅक्टर रॅली शांततेत काढली जाणार आहे. मात्र, हे सगळं वातावरण कधी बदललं ते समजलंच नाही.